कैद्यावर हल्ला करून पसार झालेला अमजद सापडेना ! पोलिसांकडून शोधाशोध

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) :  हर्सूल कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणार्‍या कैद्याने सहकारी कैद्यावर हल्ला करून पळ काढल्याची घटना रविवारी (दि.८) दुपारी घडली होती. शेख अमजद असद ऊर्फ मोहसीन (वय ४५, रा. जहागीर कॉलनी) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्हे शाखा, हर्सूल पोलिसांनी शोधाशोध केल्यानंतरही तो सापडला नाही.
याप्रकरणी कारागृह शिपाई साजीद खान नन्हेखान (वय ४५) यांनी तक्रार दिली. अमजद हा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. २०२४ मध्ये त्याला अमरावती येथून हर्सूल कारागृहात हलवण्यात आले होते. त्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. 
रविवारी अंघोळीच्या हौदावर राजू विश्वनाथ जाधव याच्याशी अमजदचा वाद झाला. अमजदने जाधवच्या डोक्यात दगड मारला. यात जाधव जखमी झाला. आरडाओरड झाल्याने नन्हेखान तेथे आले. यानंतर रक्तबंबाळ झालेल्या जाधवला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर विचारपूस करण्यासाठी बोलावले असता, अमजद कारागृहात नसल्याचा प्रकार समोर आला. यानंतर हसूल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
मूळ गावी शोध
अमजदच्या शोधासाठी कारागृहातील पोलिस, गुन्हे शाखा, हर्सूल पोलिस सर्वांनी शोध घेतला. परंतु दुसर्‍या दिवशीही अमजद हाती लागला नाही, पोलिसांनी रेल्वेस्थानक, बसस्थानक, जटवाडा रोड हा पूर्ण परिसर पालथा घातला. पण उपयोग झाला नाही. आता पोलिस त्याच्या मूळ गावी शोध घेत आहेत.